कोलकाता (प्रतिनिधी): पामेला गोस्वानी ड्रग्ज प्रकरणी कोलकाता पोलिसांनी भाजप नेते राकेश सिंह यांना अटक केली. राकेश सिंह यांच्या मुलांनाही घरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात करण्यात आली आहे. राकेश सिंह यांची मुले बंगालमधून फरार होण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

पामेला गोस्वामी भाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता असून तिला पोलिसांनी कोकेन आणि १० लाख रुपयांसह पकडले होते. या कारवाईत गोस्वामीसह आणखी दोघांना अटक केली आहे. या ड्रग्ज प्रकरणात भाजपचे नेते राकेश सिंह यांचे नाव समोर आले आहे. राकेश सिंह पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपचे महासचिव असणारे कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय आहेत. यापूर्वीच त्यांना कोलकाता पोलिसांनी नोटीस बजावली होती. ही नोटीस आल्यानंतर सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर पोलिस राकेश सिंह हे घरी पोहोचले. त्याचवेळी कोलकाता पोलिस घरी पोहोचले असता राकेश सिंह, त्यांची मुले आणि पोलिसांच्यात शब्दीक बाचाबाची झाली.