राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) येथील देस्कत परिसरातील शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. राधानगरी वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गवे असल्याची खात्री करून त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

देस्कत येथील शेतामध्ये गवा आढळून आल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात नदीकाठाला गव्यांचा वावर आढळून आला. तर सोमवारी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान स्मशानभूमीजवळ ३ गवे दिसून आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी गर्दी करून गव्यांचा पाठलाग करू नये, गवा हा हिंस्त्र प्राणी नाही. त्यामुळे गर्दी करून लोकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ करू नये, जेणेकरून गवा बिथरणार नाही, अशा सूचना वनविभागाने दिलेल्या आहेत.