कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शेडशाळ (ता. शिरोळ) येथील यात्रेतील करमणूकीच्या कार्यक्रमात शांत बसा म्हटल्याचा राग मनात ठेवून घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी जखमी प्रदिप हणमंतराव देसाई (मुळ रा. शेडशाळ, सध्या रा. प्रतिभानगर, कोल्हापूर ) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. तर या मारहाणीत उदय शशिकांत नाईक, मनोज हणमंतराव देसाई असे तिघेजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अक्षय शामराव नाईक, सचिन शंकर नाईक, तुषार संजय कोल्हापूरे, शुभम भिमू नाईक (सर्व रा. शेडशाळ), विशाल अनिल नाईक, विकास अनिल नाईक (दोघे. रा. रेवणी गल्ली, मिरज, जि. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शेडशाळ गावची यात्रा सुरु आहे. यात्रेनिमित्त शशिकांत नाईक यांच्या मालकीच्या शेतात करमणूकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम सुरू असताना संशयित आरोपींनी कार्यक्रमात दंगा घालत होते. त्यामुळे फिर्यादी देसाई यांनी शांत बसण्यास सांगितल्याचा राग मनात धरून घरात घुसून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.