कुरुंदवाड (प्रतिनिधी) : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीची करवसूलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाच्या अंगावर धावून जावून मारहाण केल्याप्रकरणी रंगराव भाऊ कांबळे (रा. काळम्मावाडी वसाहत, घोसरवाड) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद ग्रामसेवक संतोष बाबूराव चव्हाण (मूळ रा. वसंतवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. गणंजयनगर, कुरुंदवाड) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च वर्षाअखेर असल्याने, ग्रामपंचायतीची कर वसुली सुरू आहे. थकीत कर न भरणाऱ्या मिळकतधारकांच्या बाबतीत ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे वसूलीचा धडाका सुरू आहे. ग्रामसेवक चव्हाण आणि ग्रामपंचायत कर्मचारी कर वसूलीसाठी काळम्मावाडी वसाहतीत गेले होते. यावेळी संशयित आरोपी रंगराव कांबळे यांच्याकडे थकीत कराची मागणी केली.

यावेळी कांबळे यांनी सध्या पैसे नसल्याने १५ मार्च नंतर भरतो असे सांगितले. यावेळी ग्रामसेवक चव्हाण यांनी तुमचे नळकनेक्शन तात्पुरते बंद करतो. वसूली दिल्यानंतर पुर्ववत सुरु करतो असे सांगताच कांबळे यानी ग्रामसेवक चव्हाण यांच्या अंगावर धावून जावून मारहाण केली. चव्हाण यांना सोडविण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची रात्री उशिरा येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप करीत आहेत.