कोल्हापूर (प्रतिनिधी) : दौलत नगर येथे दहशत माजवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांना विरोध केल्याप्रकणी  एकास बेदम मारहाण करण्यात आली. यात गोपीचंद भीमराव नलवडे (वय ४९, रा. शाहूनगर राजारामपुरी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी ७ जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसा ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री दौलत नगर येथील दत्तवाडकर गल्लीमध्ये आलेल्या काही तरुणांनी दहशत माजवत अचानक दगडफेक सुरू केली. ५ वाहनांचे नुकसान झाले. त्यावेळी शाहूनगर परिसरात राहणारे गोपीचंद नलवडे यांनी त्या तरुणांना वाहनांची तोडफोड करू नका, असे सांगितले. त्या रागातून त्या तरुणांनी नलवडे यांना बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी गोपीचंद नलवडे यांनी ऋषिकेश उर्फ सोन्या कुराडे, आनंद बबन ऐडगे, विशाल वसंत गायधडक, विपुल मलिक, रामू कलकुट्टकी, अमित दिंडे आणि ओमकार या ७ जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. हे सर्वजण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.