कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेली दहा वर्षे ए. वाय. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते, पण गेल्या तीन-चार महिन्यापासून ते पक्षात फारसे सक्रीय नाहीत त्यामुळे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यावर पक्षाने नव्याने जबाबदारी सोपवली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आता पक्ष बांधणीत लक्ष घातले असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘बिद्री’साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून ए. वाय. पाटील नाराज होते, ते पक्षात सक्रीय नसल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. ही निवड उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, शाहूवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडली.

ए. वाय. पाटील काय भुमिका घेणार ?

राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या जिल्हा पातळीवर खांदे पालट झाली असल्याने ए. वाय. पाटील यांना एखादे पद मिळणे अपेक्षित आहे. मात्र याची शक्यता कमी असल्याने ए. वाय. पाटील काही वेगळी भुमिका घेणार का ? राजकारणाचा नवा धडा गिरवणार का ? असा ही सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे.