गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील ग्रामदैवत श्री भुतोबा मंदिरातील दानपेटी काही चोरट्यांनी फोडून त्यातील पैसे चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहीती येथील ग्रामस्थांनी दिली.

याबाबतची अधिक माहीती अशी की, आकुर्डे (ता.भुदरगड) पासून तीन किमी. अंतरावर ग्रामदैवत श्री भुतोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात दर रविवारी हजारो भावीक श्रध्येने दर्शनासाठी येत असतात श्रावण महीन्यात तर येथे गर्दीचा महापूर असतो. त्यामुळे मंदीरातल्या दानपेटीत भरघोस दान टाकले जाते. काल (रविवार) पहाटे पुजारी नियमित पुजा करण्यासाठी गेले असता दानपेटी नियमित जागेपासून हलल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच पेटीखाली काही रक्कम पडल्याचे दिसून आले.

यावेळी दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाच्या मदतीने त्यांनी ही पेटी उलटी करून पाहिली असता पेटीच्या खालील बाजूस असलेला कुलुपबंद छोटा दरवाजा उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पण हा दरवाजा निघाला किंवा तुटला नसल्याने यातील रक्कम सुरक्षीत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुजाऱ्यांनी या गोष्टीची कल्पना देवस्थान समिती आणि मानकऱ्यांना दिल्यानंतर समितीचे सदस्य आणि मानकऱ्यांनी पाहणी करून सर्वासमक्ष पेटीचे कुलुप काढून त्यातील जमा झालेली रक्कम समीतीकडे सुपूर्त केली.