कोल्हापूर ( प्रतिनिधी ) संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुर्ण केलं आहे. यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

नार्वेकर यांनी अनेक वर्षातील निकालांचा आधार घेत हा निकाल दिला आहे. यावेळी त्यांनी भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचा निर्णयही विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. हा ठाकरे गटाला धक्का समजला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला कौल एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटाच्या गोटात नाराजीचा सुर असून, एकनाथ शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण आहे. याबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झाली असून, या निकालावरुन आता पुन्हा आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडणार हे मात्र निश्चित.

21 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही. असं नार्वेकरांनी म्हटलं.

बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाहीये.