टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथे दोन शेजारी राहणाऱ्या गटात तलवार, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठ्यांनी झालेल्या मारामारीत सातजण जखमी झाले आहेत. त्यांनी परस्परां विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे फिर्यादी जयप्रकाश बापुसो पाटील (वय ६०, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) आणि अर्चना काकासो पाटील (रा. हालोंडी) हे एकमेकांचे शेजारी आहेत. काल सकाळी आंब्याच्या पाला आपल्या दारात टाकलेल्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून महावीर पाटील (रा. हालोंडी),  राजेंद्र सुरेंद्र पाटील  (रा. मांगुर, ता. निपाणी, जि. बेळगाव), प्रमोद पारसा पाटील, संतोष जयपाल पाटील, राजकुमार राजेंद्र पाटील, महावीर सुरेंद्र पाटील हे सर्व (रा. मांगुर), सुवर्णा काकासो पाटील (रा. हलोंडी), अर्चना काकासो पाटील( रा. हालोंडी) यांनी बेकायदेशीर जमाव करून आमच्या घरात घुसून माझ्यासह माझा भाऊ अशोक पाटी, पुतण्या अजय पाटील यांना तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद जयप्रकाश पाटील यानी दिली.

तर सकाळी झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महावीर पाटील, राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील याना जयप्रकाश पाटील, अजय पाटील, धीरज पाटील,  वैभव पाटील,  अक्षय पाटील,  सम्मेद पाटील,  अमर दाभाडे, अशोक पाटील, ज्योती जयप्रकाश पाटील, नेहा जयप्रकाश पाटील,  माणिक उर्फ शोभा पाटील यानी जमाव करून तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. यामध्ये अर्चना पाटील, महावीर पाटील राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील हे जखमी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या १९ जणांवर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.