कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना लुटणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४२, रा. गोसावी गल्ली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोटारसायकली आणि दागिने असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यामध्ये महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी तपासासाठी एक विशेष पथक नेमले होते. हे पथक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय मार्गावर गस्त घालत असताना सांगली फाट्याजवळ एक तरुण या पथकाला आढळून आला.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी, सांगली जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी अशा सहा वृद्ध महिलांचे दागिने लूटल्याची कबुली दिली. त्यामुळे विशाल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने कांबळे याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.