मुंबई (प्रतिनिधी) :  भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच धमाका केला आहे. गोव्याकडून आपली पहिलीच रणजी ट्रॉफी मॅच खेळताना अर्जुन तेंडुलकरने १७९ चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचा सामना राजस्थानविरुद्ध सुरु आहे. २३ वर्षांच्या अर्जुनचा हा पहिलाच सामना होता.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुनने उत्कृष्ट खेळ करत राजस्थानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. अर्जुन तेंडूलकरने १७८ चेंडूमध्ये शतक केले. ज्यात १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. याशिवाय त्याने २६ एकेरी, ७ दुहेरी धावा केल्या. ५६ च्या स्ट्राईक रेटने केलेल्या या खेळीत अर्जुनने १३१ डॉटबॉल खेळले. अर्जुन तेंडुलकरने या इनिंगमध्ये सुयश प्रभुदेसाईसोबत रेकॉर्ड २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. दोघांनी ३३३ चेंडूमध्ये २०० धावा केल्या. यात अर्जुनचे योगदान सर्वाधिक होते.