अर्जेंटिना (वृत्तसंस्था) : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली आहे. कतारमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक-२०२२ नंतर तो फुटबॉलमधून निवृत्त होणार आहे. मेस्सीने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान निवृत्तीबाबतची घोषणा केली आहे.

३५ वर्षीय फुटबॉलपटू मेस्सीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकानंतर मी या खेळातून निवृत्ती घेईन. मी आधीच निर्णय घेतला आहे आणि संघाला याची माहिती दिली आहे, हा माझा शेवटचा विश्वचषक असेल.’ मेस्सीच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मेस्सीने अर्जेंटिनाकडून चार विश्वचषक खेळले आहेत. २०२२ मध्ये होणारा विश्वचषक हा त्याचा पाचवा फिफा विश्वचषक असेल. मेस्सीने २००५ मध्ये अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १६४ सामन्यात ९० गोल केले आहेत. विश्वचषकातील १९ सामन्यांत त्याने ६ गोल केले आहेत. मेस्सीच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर मेस्सीने आतापर्यंत ७८१ गोल केले आहेत.

मेस्सीला लहानपणापासून फूटबॉलची आवड आहे. वयाच्या ६ व्या वर्षी तो रस्त्यावर १५ ते २० मिनिटे फुटबॉल खेळत होता. रस्त्यावर आपल्या दोन्ही पायांनी तो बॉल सोबत खेळायचा. त्याने कधीच बॉल खाली पडून दिला नाही. एवढ्या लहान मुलाला हे करताना पाहून लोक मेस्सीला बक्षीस म्हणून पैसे द्यायचे. तेव्हापासूनच लोकं त्याला भविष्यातील फुटबॉलपटू म्हणू लागले.