मुंबई – राज्यात निवडणूक प्रचाराची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. रणरणत्या उन्हातही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. आरोपप्रत्यारोपाचे बॉम्ब फोडले जात आहेत. गौप्यस्फोट होत आहेत. गोपनीय चर्चा उघड केल्या जात आहेत. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली जात आहे. अशातच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि विरोधकांनी टीका केली होती. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांना पाठिंबा देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का? असा खोचक सवाल अजित पवार यांनी विरोधकांना केला आहे. आज अमरावती दौऱ्यावर ते बोलत होते..

काय म्हणाले अजित पवार ..?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आता तुम्ही नवनीत राणा यांना मतदान करा. आम्ही जर तुमचे कामे केले नाही तर आम्हाला विधानसभेमध्ये उभे करू नका. आम्हाला चले जावं म्हणा, असं सांगतानाच विरोधक नवनीत राणा यांच्यावर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला. अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांची चांगलीच फिरकी घेतली. संविधानाच्या मुद्द्यावरून अजितदादांनी विरोधकांचे चांगलेच कान टोचले. बाबासाहेबांनी या देशासाठी उत्तम संविधान दिलं आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाहीये. सांगायला काही नाही म्हणून घटना बदलणार असल्याचं विरोधक सांगत आहेत, असं अजित पवार म्हणाले

2014 आणि 2019 मध्ये आम्ही मोदींना विरोध केला. तेव्हा 2014 मध्ये नवनीत राणा यांना आम्ही उमेदवारी दिली. 2019 मध्ये राणा यांना पाठिंबा दिला. आताही आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे नवनीत राणा विजयी होतील, असं ही अजित पवार यावेळी म्हणाले