मुंबई (प्रतिनिधी) : सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरूच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत त्यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा, असा सल्लाही केंद्र सरकारला दिला आहे.

‘जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे, त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्ये आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो, हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले नसते. सर्वांनीच शेतकऱ्यांना समर्थन दिले पाहिजे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन केलं पाहिजे. शेतकऱ्यांशी तिथे जाऊन चर्चा केली पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे ?’, असे खडे बोलही त्यांनी सरकारला सुनावले आहेत.