कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून, पोलीस ठाण्याचे सपोनि या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे. तरी नवनियुक्त जिल्हा पोलीस प्रमुख शैलैश बलकवडे यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कळेसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. पण याकडे संबंधित पोलीस अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कळेसह परिसरात अवैध मद्यविक्री, मटका, जुगार, खाजगी सावकारी, अवैध पेट्रोल विक्री, इत्यादी धंद्याना ऊत आला आहे. कोरोनाकाळात अपयशी ठरलेले कळे पोलीस ठाण्याचे सपोनि यांच्या कारभाराविषयी परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. १४ जून २०१९ला ते कळे पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांच्या कालावधीत काही किरकोळ कारवाई वगळता ठोस अशा कारवाई झाल्या नाहीत. तसेच यापूर्वी या भागातील बरेच खटले आणि तक्रारी या आपापसात मिटवण्याचा प्रयत्न संबंधित पोलीस ठाण्याअंतर्गत होत असे. पण हे अधिकारी आल्यापासून अगदी किरकोळ गुन्हेही नोंद न होऊ लागल्याने संबंधित अधिकारी यांच्यावर नागरिकांचा रोष दिसून येत आहे.
तसेच काही नागरिकांकडून तर कायद्यावरील विश्वासच उडाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. वेतवडे (ता. पन्हाळा) येथील दलित समाज प्रकरण असो, अथवा काळजवडे (ता. पन्हाळा) येथील अॅट्रॉसिटी प्रकरण असो. त्यामुळे अनेकांचा कायद्यावरील विश्वास उडाला असून, दडपशाही मार्गाचा अवलंब करून प्रकरणावर पडदा टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. एखाद्या गुन्हेगाराने एखादा गुन्हा केला असेल, तर त्याला शिक्षा न करता हातमिळवणी करून त्याला पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. अशा परिस्थितीत, ‘आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे. गुन्हा दाखल न करता पैशाच्या लालसेपोटी गुन्हेगाराला मोकाट सोडून दिले जात असल्याचे, नागरिकांतून बोलले जात आहे.
त्यामुळे कळे पोलीस ठाण्याचे मुख्य अधिकारी यांची तातडीने बदली व्हावी, यासाठी अनेक नागरिकांनी आमदार आणि पालकमंत्री यांना विनवणी केली. मात्र कोणताही प्रतिसाद दिसून आला नसल्याने सामान्य लोकांमधून शंका-कुशंका वाढल्या आहेत. सध्या कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखपदी अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अशा शैलेश बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये येता क्षणी कर्तृत्वात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी संबंधित अधिकारी यांची तात्काळ बदली व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.