श्रीमती लक्ष्मी लठ्ठे, शाम पवार, विनोद बेले, चंद्रकांत पाटील व इनरव्हील क्लबला पुरस्कार प्रदान

सांगोला (प्रतिनिधी )

आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. भारुडाची जुगलबंदी, पुरस्कार वितरण व “दारू नको दूध प्या” असे विविध उपक्रम आपुलकीच्या वतीने घेण्यात आले.

आपुलकी प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नववर्षाच्या पूर्वसंध्येला सांगोला येथील छ. शिवाजी महाराज चौकात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ मा. बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तानाजी घाडगे महाराज देगाव, दादा महाराज चव्हाण कडलास, दादा पाटील जत, गोपाळ काटवटी महाराज पळशी आदी भारुडकारांनी आपली भारुड कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमची साथ नवनाथ शिंदे (शेगाव) यांनी, ढोलकीचे साथ धनाजी केंगार (रामपूर जत) यांनी भजन साथसंगत बिलेवाडी व वासूद येथील भजनी मंडळानी केली. या भारूड जुगलबंदीसाठी तानाजीकाका पाटील यांचेही सहकार्य लाभले.

मध्यंतरात आपुलकीच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानाचा फेटा देऊन श्रीमती लक्ष्मी सुभाष लठ्ठे यांना कृतिशील आदर्श माता पुरस्कार, शाम सोपान पवार यांना समाजसेवा प्रेरणा पुरस्कार, विनोद सुरेश बेले यांना सृजनशील शेतकरी पुरस्कार, चंद्रकांत दामोदर पाटील यांना सार्थ स्वाभिमान पुरस्कार तर इनरव्हील क्लब, सांगोला यांना आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व सत्कारमूर्तीचे प्रतिनिधी म्हणून इनरव्हील क्लब अध्यक्षा उमा उंटवाले यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात उपस्थित सर्व रसिकांना मसाला दूध देऊन नव वर्षाचे स्वागत ” दारू नको, दूध प्या ” या उपक्रमाने करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. मनोज उकळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.