कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर मेन्स (ओपन) दि.१४ ते २० डिसेंबर रोजी पुणे येथे होणार आहेत. या स्पर्धेवेळी संतोष ट्रॉफी २०२२-२३ साठी महाराष्ट्र राज्याचा फुटबॉल संघ निवड चाचणी शिबिरासाठी ४० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी वे.इं.फु. असो. च्या वतीने समिती नेमण्यात आली आहे. कोल्हापूरचे एन.आय.एस. प्रशिक्षक व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू श्रीनिवास जाधव यांची निवडकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात खेळाडू व प्रशिक्षक म्हणून गेली अनेक वर्षापासून कार्यरत असणारे अनुभवी असे श्रीनिवास जाधव यांनी केएसएच्या जिल्हा फुटबॉल संघासाठी प्रशिक्षक म्हणून उत्कृष्टरितीने कामकाज केलेले आहे. केएसएशी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत.

श्रीनिवास जाधव यांना संस्थेचे पेट्रन-इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज, पेट्रन्मेंबर माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन व तसेच ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचेही प्रोत्साहन लाभले.