कोल्हापूर (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर परिपूर्ण अर्ज (ऑनलाईन पध्दतीने) भरण्याची मुदत दि.२५ ऑगस्टपर्यत आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण वाढण्याकरिता प्रयत्न करावेत. नोंदणी करण्यात आलेले परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इयत्ता ११ वी व १२ वी) व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना आदी शिष्यवृत्ती योजना महाडिबीटी पोर्टलव्दारे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.