मुंबई (प्रतिनिधी) :  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात आज अनिल देशमुख यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अनिल देशमुख यांना २७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिल देशमुख हे दि. २९ ऑगस्ट रोजी चक्कर येऊन तुरूंगात पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्यादिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ झाली आहे. त्यांना २ नोव्हेंबर २०२१ साली अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये देशमुख व वाझे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.