मुंबई (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आज (सोमवार) ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडणारा व्हिडिओ ट्वीट केला आहे. याआधी त्यांनी २ जुलैला ट्वीट केले होते.  

या व्हिडिओत देशमुख यांनी म्हटले आहे की, नमस्कार, मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला. तेव्हा मी त्यांना कळवलं की, माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.

ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले, तेव्हा मी व माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी ईडीला सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले. त्या दोन्ही वेळा मी स्वतः सीबीआयच्या कार्यालयात जाऊन माझा जबाब दिला. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झालोय, असे देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर या प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली असता अचानक अनिल देशमुख गायब झाले होते.