माढा : लोकसभा निवडणुकीचे राज्यात रणांगण चालू आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने पक्षातील उमेदवारांचे नाराजीचे सत्र पाहायला मिळत आहे. अशातच अद्यापही महायुतीची जागा वाटपाचा घोळ संपायचं नाव घेत नाहीय. उमेदवारी न मिळाल्याने आमदार खासदारांचे पक्ष स्थलांतराचे करत आहेत . अशातच माढा लोकसभा निवडणूक अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. .माढा लोकसभा उमेदवार नक्की कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

माढा लोकसभा निवडणुक उमेदवारीसाठी रणजीतसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार चर्चा सुरु होती. अशातच महायुतीकडून माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकिट देण्यात आले. या उमेदवारीला स्थानिक नेतृत्वाकडून विरोध सुरु आहे. त्यामुळे माढ्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे . अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हेही खासदारकीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत शक्तीप्रदर्शनही केले. धैर्यशील मोहिते पाटलांची समजूत काढण्याचा भाजपकडून सर्वोत्परी प्रयत्न केले जात आहेत. पण धैर्यशील मोहिते पाटील भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतेय. धैर्यशील मोहित पाटील यांच्या समर्थकांकडूनही उमेदवारीसाठी भाजप नेत्यांना विचारणा देखील कऱण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन अकलूजमध्ये आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना तिकिट द्या. निंबाळकर यांची उमेदवारी बदला… अशी मागणी कऱण्यात आली होती. त्याशिवाय काही कार्यकर्त्यांच्या मते, भाजपने उमेदवारी दिली नाही, तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची तुतारी हातात घ्यावी.. अशी मागणी केली.

माढ्यातील राजकारण तापलं असतानाच एका कार्यकर्त्यानं देवेंद्र फडणवीस यांना रक्तानं पत्र लिहिले आहे. धोंडेवाडी येथील महेश लोखंडे यांनी मोहिते पाटलांसाठी रक्तानं पत्र लिहिले आहे. पंढरपूर तालुक्याच्या धोंडेवाडी येथील महेश लोखंडे या तरुणाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहीत खासदार रणजितसिंह निंबाळकर हे लोकांच्या संपर्कात नसतात; ते निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे निंबाळकरांची उमेदवारी रद्द करून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, असं पत्र स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं आहे. आता या घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे