पुणे/प्रतिनिधी : शिरूर लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले शिवाजी आढळराव-पाटील यांच्यात लढत होणार आहे. तर शिरूर लोकसभेची निवडणूक ही अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. तर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवनेरी गडावर समोरा समोर आले. यावेळी कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि आढळरावांच्या पाया पडले आणि आशीर्वाद ही घेतला. तसेच दोघांनीही एकमेकांना शिरूर लोकसभेसाठी शुभेच्छा ही दिल्या.

दरम्यान, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे सकाळच्या सुमारास दोघेही शिवनेरी गडावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. यावेळी दोघाही रस्त्यात भेट झाली. दोघांचे कार्यकर्ते आणि गडावरील लोक उपस्थित होते. आढळराव पाटील समोर येताच अमोल कोल्हेंनी थेट वाकून आढळराव पाटलांना नमस्कार केला. त्यानंतर दोघांमध्ये हसत गप्पा झाल्या आणि हस्तांदोलन करुन दोघेही मार्गस्त झाले मात्र या कृत्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन झालं.

ज्येष्ठ व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती!
या सगळ्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले की, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते.वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे आणि लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.