भंडारा : शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर भाजपवाल्यांनी आमचा पक्ष फोडला, असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणत आहेत. पण मी महाराष्ट्राच्या जनतेला एक स्पष्ट करायला आलो आहे. आम्ही ना शिवसेना फोडली आणि ना राष्ट्रवादी फोडली. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाच्या मोहाने शिवसेना फोडली. शरद पवार यांच्यादेखील पुत्रीमोहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

अमित शाह आज भांडार दौऱ्यावर प्रचारसभेसाठी आले असता त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

दरम्यान, महायुतीचे भंडाऱ्याचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भंडाऱ्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसची आज काय अवस्था झाली, आर्धी शिवसेना आणि आर्धी राष्ट्रवादीने पूर्ण काँग्रेसला आर्ध केलं आहे. हे तीन अर्धवट पक्ष महाराष्ट्राचं भलं करु शकतात का? महाराष्ट्राचं केवळ आणि केवळ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी भलं करु शकतात”, अशी टीका अमित शाह यांनी केली.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात अर्धी शिवसेना आणि अर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिल्लक आहे. या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षालाही अर्धेमुर्धे केले आहे. हे तीन अर्धवट पक्ष कारभार करु शकतील का? महाराष्ट्राचं भलं केवळ नरेंद्र मोदी आणि भाजप हेच करु शकतात. ही देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताला पुढे नेण्याचं काम केलं आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.