कोल्हापूर ( प्रतिनिधी ) नुकत्याच पार पडलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आजरा तालुक्यातील मडिलगे येथील बुथ क्रमांक 18 वरती जवळपास 350 ते 400 बनावट आधारकार्डचा वापर करून बोगस मतदान केले असल्याचा आरोप चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समरजितसिंह घाटगे यांच्यासह प्रमुक कार्यकर्त्यांनी आज जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेतली असून याबाबतचे निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, मडिलगे येथील बुथ क्रमांक 18 वर 350 ते 400 बोगस मतदान करण्यात आले आहे.

हे बोगस मतदान करणाऱ्या मुख्य आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी व या घटनेमागील सूत्रधारांचा तात्काळ शोध घ्यावा, यासाठी चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्यावतीने जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदन दिले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात पोलिसांनी तिघा जणांना अटक केली होती. यावेळी गुन्ह्याची कबूली दिली होती. मात्र त्यांच्यावरती अत्यंत जुजबी कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उच्चतम कलमांखाली कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक अण्णा चराटी, श्री. भिकाजी गुरव, श्री. सदानंद पाटील, श्री. मारुती येसने उपस्थित होते.