मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने ज्या शहरात पॉझिटीव्हीटी रेट कमी असल्यास जिल्ह्यापेक्षा वेगळा निर्णय घेवून त्या शहराला अनलॉकसाठी परवानगी दिली आहे. शहराचा पॉझिटीव्हीटी रेट कमी येवूनही शहरातील व्यापार सुरळीत सुरु होत नाहीत. यामुळे व्यापारी आणि प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराकरिता स्वतंत्र युनिट करून शहरातील सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, संपूर्ण जिल्हा सध्या अनलॉकमध्ये आहे. गेली अनेक महिने व्यापार बंद असल्याने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्यातून नाराजी व्यक्त होत असून, सर्व दुकाने सुरु करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. वास्तविक पाहता, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण आदी परिसराचा केंद्रबिंदू कोल्हापूर आहे. सीपीआरसह इतर सरकारी व खाजगी वैद्यकीय सेवा चांगल्या व माफक दरात उपलब्ध असल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागातून शहरात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परराज्यातील रुग्णही कोल्हापुरात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी आणि इतर जिल्हे आणि परराज्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाल्यानेही कोल्हापूरचा पॉझिटीव्हीटी रेट वाढल्याचे दिसत आहे.

याचा फटका कोल्हापूर शहराला बसत असून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. यासह कोल्हापूरचा विकासही रखडला आहे. कोल्हापूर शहरात सध्या पॉझिटीव्हीटी रेट कमी येत असून, कोल्हापूरचे जनजीवन सुरळीत करण्याकरिता कोल्हापूर शहराचे स्वतंत्र युनिट करून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी आणि व्यापारी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक अहवाल तातडीने मागविण्यात आले असून, याबाबत शासन सकारात्मक निर्णय देवून व्यापारी वर्गास दिलासा देईल, असे आश्वासन दिले.