कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा उद्या (शुक्रवार) दसऱ्यादिवशीही सुरू राहणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी.  माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केडीसीसी बँकेने अलीकडेच साडेसात हजार कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे नऊ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे. तसेच बँकेचा संयुक्त व्यवसायाचा आलेखही १५ हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे. बँकेच्या ठेवीदारांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या नजीकच्या शाखेमध्ये जाऊन ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही डॉ. श्री. माने यांनी केले आहे.

तसेच गेली दोन वर्ष सुरू असलेल्या कोविड  संसर्गाच्या महामारीतसुद्धा बँकेने शेतकऱ्याला विनाविलंब पिककर्ज पुरवठा व मध्यम मुदत कर्ज पुरवठा करून शेतीच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच सरकारने दिलेल्या पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करीत या बँकेने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या इतर अनुषंगिक गरजांसाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठाही केला आहे.

कोरोनाच्या काळात ग्राहकाला घरातूनच व्यवहार करता यावेत यासाठी केडीसी बँकेने ‘केडीसीसी मोबाईल बँकिंग’ व ‘केडीसीसी बँक ऑन व्हील्स’ ही गावोगावी अद्ययावत सुविधा सुरू केली आहेत. बँकेच्या शाखा नसलेल्या गावातून उभारलेल्या मायक्रो एटीएम सेंटर्सनाही ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच दूध वितरकांचा दूध बिल भरणा सुट्टी न घेता स्वीकारला जातो, हेही या बँकेचे वैशिष्ट्य असल्याचे पत्रकात म्हटले आहे.