टोप (प्रतिनिधी) :  सादळे-मादळे घाटात काल (मंगळवार) रात्री ११ च्या सुमारास कारचा ब्रेक निकामी होऊन कार दगडावर आदळल्याने कार जळून खाक झाली. प्रसंगावधानाने चालकाने कारमधून उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गोवा येथील सलीम अहमद यांची बीएमडब्ल्यू  एम एच १२ बी एक्स ४५४५ ही गाडी शिरोली -मळवडी भागातील समीर मिस्त्री ( वय 30) यांच्याकडे  दुरुस्तीसाठी तीन दिवसांपूर्वी सोडली होती. समीर याने कारचे काम करून कारची ट्रायल घेण्यासाठी सादळे-मादळे येथे घाट माथ्यावर गेला. परंतु, ते परत शिरोलीकडे येत असताना घाटात उताऱ्यावर कारचा ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. समीर याने कारमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. पण, कार तशीच पुढे जावून दगडावर आदळल्याने कारने पेट घेऊन कारचे मोठे नुकसान झाले.

काल रात्री पाऊसही मोठ्या प्रमाणात सुरू होता. इथल्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण  कारने जोराचा पेट घेतल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आल्यावर ही  आग आटोक्यात आली. परंतु, लाखो रूपये किमतींच्या अलिशान कारची ट्रायल घेणे मिस्त्रीच्या जीवावर बेतले असते. शिरोली ते सादळे मादळे घाटात आठ किमी अंतरावर असून कारची ट्रायल घेण्यासाठी घाट गाठला की आलीशान गाडी चालवण्याचा मोह समीरला आवरता आला नाही म्हणून आठ किमीचे अंतरापर्यंत मजल मारली.

तर गाडी पेटली की पेटवली हा संशोधनाचा विषय असुन इतक्या लहान धडकेत गाडी पेटणार नाही, असे स्थानिक तसेच तेथे उपस्थित लोकांचे मत आहे. तर काही लोक ही आग विझवताना त्यांना मज्जाव करीत होते. यामुळे ही आग लागली की बनाव होता याची चौकशी होण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरीकांनी व्यक्त केले आहे.