मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीची प्रचारसभा झाली. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना चुकून अजित पवार यांनी जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटील यांचा उल्लेख केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कुठे काही भाषणं केली की वेगळा अर्थ काढला जातो, पाहिजे तसे अर्थ काढला जातो. कर्नाटकात पाणी वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागात, पुरंदर, बारामती इंदापूर दौंडच्या परिसरात आणणार. हे पाणी जे कमी पडतंय. राहुल कुल, दत्ता भरणे, रमेश थोरात, आम्ही सगळेच यासाठी प्रयत्न करत आहे. जलसंपदा मंत्री या नात्याने जयंत पाटील असा उल्लेख करताच अजित पवारांनाही हसू रोखता आलं नाही. त्यानतंर अजित पवार यांनी आपली चूक दुरुस्त केली. तर जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनीही याला होकार दिला आहे.

पुण्यात झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये आज देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, एकनाथ शिंदे अशा अनेक स्टार प्रचारकांनी जोरदार भाषणं केली. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकीकडे रामदास आठवलेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केलेल्या कवितांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला, तर दुसरीकडे अजित पवारांनी भाषणादरम्यान जयंत पाटलांचा जलसंपदामंत्री म्हणून उल्लेख केला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या!

“बारामतीची निवडणूक भावकीची नाही”
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असताना अजित पवारांनी मात्र ही भावकीची निवडणूक नसल्याचं म्हटलं आहे. “ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. विनाकारण त्यात भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो”, असं अजित पवार म्हणाले.