कराड : सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशा प्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, रोज आपण बघतो कोणीतरी काहीतरी वक्तव्य करतो. कोणी अरे म्हटले की, का रे म्हणायचे असे सगळे चालू आहे. ही यशवंतराव चव्हाणांची शिकवण नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी कराड येथे चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला आणि त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांबाबत आपले मत व्यक्त केले. मी कोणाचे नाव घेऊन बोलत नाही. मी कोणालाही डोळ्यासोर ठेवून बोलत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील सगळ्यांसाठीच बोललो, असे उत्तर अजित पवारांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रसार माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिले आहे.
छगन भुजबळ मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यांना आवर का घालत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर ओबीसींच्या महाएल्गार सभेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, याबाबतची मागणी केली आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे मराठा वि. ओबीसी असा वाद पेटत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे, तर भुजबळांच्या वादाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. याच वादावर आणि बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवर अजित पवार यांच्याकडून भाष्य करण्यात आले आहे.