नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी छावण्या उदध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आज कोणताही गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सैन्यदलाच्या प्रवक्त्याने व्यक्त केलीय.

एलओसीवर सतत होणाऱ्या बर्फवृष्टीचा फायदा घेऊन पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानाकडून घुसखोरी झाल्यास भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख उत्तरही दिलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या घुसखोरीला आव्हान देत भारताने पुन्हा एकदा ताबारेषेपलीकडे थेट लक्ष्यभेद साधत मिसाइल हल्ला केला आणि तोफांचा मारा करत पाकिस्तानी सैनिकांना टिपलं. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यातले अतिरेक्यांचे तळही उद्ध्वस्त केले. लष्कराने १३ नोव्हेंबरपासून नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करून ही कारवाई केली आहे. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं होतं.