कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार ? यावर अद्याप पडदा पडलेला नाही. मात्र कोल्हापूरची जागा आपल्याकडे हवी यासाठी उद्धवसेना आणि आता राष्ट्रीय काँग्रेसने देखील आपली ताकद पणाला लावली असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने काँग्रेसने या जागेवर आपला दावा केला असून, उद्धव सेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी काही तासांपूर्वी या जागेसाठी आपण पक्ष श्रेष्टींशी चर्चा केली असून या जागेसाठी मुंबईपर्यंत ताकद लावल्याचे म्हटलं आहे.

सध्या श्रीमंत शाहू महाराज यांच्यारुपाने कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस तर कोल्हापूर सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला एकही जागा लढायला मिळणार नाही, त्यामुळे कोल्हापूर दिल्यास सांगली शिवसेनेला द्या असा शिवसेना ठाकरे गटाचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकसभेसाठीच्या या जागेचा नेमका काय निर्णय होणार ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावरुन तर्क – वितर्क लावले जात आहेत.