कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने उद्या, सोमवारपासून प्रशासकीय राजवट सुरू होत आहे. आयुक्त कादंबदी बलकवडे प्रशासक म्हणून कामकाज करतील. नवीन सभागृह येईपर्यंत प्रशासकच असेल. या काळात थेट पाईप लाईनसह रखडलेले शहर विकासाचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान प्रशासक म्हणून आयुक्त बलकवडे कशा पध्दतीने पेलणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यमान सभागृहाची मुदत रविवारी म्हणजे आज १५ नोव्हेंबरला संपली. कोरोना आजारामुळे अद्याप निवडणूक प्रक्रिया सूरू झालेली नाही. परिणामी नवीन सभागृह येण्यास विलंब लागणार आहे. या काळात प्रशासकीय राजवट राहणार आहे. आताच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली असली तरी दिवाळीची आणि शनिवार, रविवारची सुट्टी असल्याने सरकारने गुरूवारीच आयुक्त बलकवडे यांची प्रशासक म्हणून निवड जाहीर केली. त्यामुळे विद्यमान महापौर, उपमहापौर, नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आले. सुट्टीमुळे मुदतीपूर्वी दोन दिवसआधीच त्यांना अधिकार गमवावे लागले. ते आता माजी नगरसेवक झाले आहेत.

दरम्यान, गेल्या पाच वर्षात सत्ता संघर्षात शहरात भरीव विकासाची कामे झाली नाहीत. केवळ आरोप, प्रत्यारोपाने सभागृह गाजले. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणांची लक्तरे वेशीवर टांगली. म्हणून शहरवासीयांच्या आता प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.