कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व २.८७ कोटी ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या बिलापासून ५ महिन्यासाठी अदानी (इंधन) समायोजन आकार या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.

याशिवाय थकीत इंधन समायोजन आकार १२२६ कोटी रू., अदानीचे राहीलेले देणे ७७०९ कोटी रू. व समान करार असलेल्या रतन इंडियाचे देणे हा बोजा डिसेबर २०२२ पासून लागू होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी जाहीर पत्रकाद्वारे दिली आहे.

त्याशिवाय महावितरण कंपनी सप्टेंबर २०२२ नंतर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल करणार हे निश्‍चित आहे. या याचिकेद्वारे २ वर्षांचा कोरोना काळातील घाटा व खर्चातील वाढ या नावाखाली पुन्हा २०,००० कोटी रू. व अधिक वाढ मागणीची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच जागरूकतेने या दरवाढीस विरोध करणे व शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी चळवळ व आंदोलन करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने दि. ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या आठवड्यात राज्यात सर्वत्र जिल्हा, विभाग वा तालुका स्तरावर आंदोलन जाहीर केलेले आहे.