बंगळुरु (वृत्तसंस्था) : ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ति कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली आहे. बंगळुरु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली. मेडिकल टेस्टमध्ये सिद्धांत कपूरने ड्रग्ज घेतल्याचे उघड झाले आहे. सिद्धांत कपूरला बंगळुरुच्या उलसुरु पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले  आहे.

बंगळुरू पोलिसांनी शहरातील एमजी रोडवर असलेल्या एका हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली त्यावेळी सिद्धांत कपूरसह काही जणांना ताब्यात घेण्यात आले. हॉटेलमध्ये असलेल्यांची चाचणी करण्यात आली. सिद्धांत कपूरसह एकूण सहा जणांच्या चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच त्यांनी ड्रग्जच सेवन केल्याचे आढळून आले आहे.

सिद्धांत कपूर प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आहे. सिद्धांत कपूर स्वतःही सिनेसृष्टीशी जोडलेला आहे. सिद्धांत कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, सिद्धांत कपूरचे करिअर फ्लॉप राहिले आहे. चित्रपटांबरोबरच सिद्धांत कपूरने वेबसीरिज आणि म्युझिक व्हिडीओमध्येही काम केलेले आहे. अनेक भूमिका करूनही सिद्धांत स्वतःची ओळख निर्माण करू शकलेला नाही. सिद्धांतने बहीण श्रद्धा कपूरसोबत हसीना पारकर सिनेमामध्येही भूमिका केलेली आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आलेली आहेत. या कलाकारांना एनसीबीकडून चौकशीसाठीही बोलवले गेले होते. यात सिद्धांत कपूरची बहीण अभिनेत्री श्रद्धा कपूरचेही नाव आले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर एनसीबी अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या रडारवर आली होती. याच प्रकरणात एनसीबीने श्रद्धा कपूरची चौकशीही केली होती. श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूतने छिछोरे चित्रपटात सोबत काम केले होते.