नवी दिल्ली (वृत्तसंस्था): बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलीन फर्नांडिसला २६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींहून अधिक रुपयांच्या वसुलीचा आरोप आहे. अलीकडेच, ईडीने याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ईडीने जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याचे आधीच माहीत होते, असे ईडीला तपासात समजले आहे. सध्या या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला अटक करण्यात आलेली नसून न्यायालयाने आता या प्रकरणी दखल घेतली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्याचे आढळून आले. त्यानंतर ईडीने कारवाई करत त्याची ७ कोटींची मालमत्ता जप्त केली.