चेन्नई (वृत्तसंस्था) : दाक्षिणात्य अभिनेत्री वीजे चित्राने (वय २८) चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन मंगळवारी (दि.८) रात्री २.३० वाजता आत्महत्या केली. नैराश्य आल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.  चित्रा प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाल्यानंतर एकत्रच  राहत होती. मात्र, अचानकपणे तिने आत्महत्या केल्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

हेमंतने पोलिसांना सांगितले की, इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता  चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये आली. आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.  दरम्यान, ‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे चित्राला स्टारडम मिळाले होते.