कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलायात्री पुरस्काराने आजपर्यंत केलेल्या कलेचे सार्थक झाले. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या चित्रपटातील काम पाहिले होते. कोल्हापूरच्या मातीमध्ये अभिनयातील दादा लोक होऊन गेले. अशी अनेक रत्ने आहेत, ज्यावर बायोपिक होऊ शकते. अशा ठिकाणचा पुरस्कार हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी केले.

दानवे परिवारातर्फे देण्यात आलेल्या कलायात्री पुरस्कार वितरण प्रसंगी अभिनेते संदीप कुलकर्णी हे बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये १४ वा कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीमध्ये खलनायक व नाट्य दिग्दर्शक म्हणून काम केलेले नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे दरवर्षी कलायात्री पुरस्कार देण्यात येतो. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारवेळी अभिनेते संदीप कुलकर्णींची प्रकट मुलाखत घेण्यात आली. कमला कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. सुजय पाटील यांनी ही मुलाखत घेतली.

श्वास, डोंबिवली फास्ट, डोंबिवली रिटर्न, गैर, टेरिटरी, मम्मो, हजारो ख्वाईशे ऐसी, हथियार, शूल, ट्रॅफिक सिग्नल, डी-डे असे अनेक मराठी हिंदी चित्रपट तसेच गुंतता हृदय हे, अवंतिका अशा मालिकातून संदीप कुलकर्णी हे अभिनेते घरोघरी पोचले आहेत. ते प्रथम चित्रकार होते. चित्रकार ते अभिनेता हा त्यांचा प्रवास याप्रसंगी उलगडला. यावेळी जयशंकर दानवे यांची कन्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे यांच्या ‘स्वरांचे चांदणे (गायक-गायिका), अनवट (मराठी संगीतकार), आस्वाद (कथासंग्रह) या ३ पुस्तकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूरचे प्रकाशक जीवन जोशी, अनुपमा घाटगे डॉ. सुजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र वाचन जयश्री दानवे यांनी केले. अनुपमा घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी आशीष भागवत, सुधीर पेटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.