कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी होम आयसोलेटेड रुग्णांवर आता महापालिका व पोलिस पथकांचा वॉच राहणार आहे. कोरोनाबाधित होम- आयसोलेटेड रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन होम आयसोलेटेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.
शहरातील वाढता कोरोना संसर्ग विचारात घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे राबविण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला नुकतीच एका बैठकीत केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने याबाबत प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्यावर भर दिला असून महापालिका आणि पोलीसदल यांची संयुक्त पथके तैनात केली आहेत. ही पथके होम- आयसोलेटेड रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन होम आयसोलेटेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. कोरोना बाधित होम- आयसोलेटेड रुग्णांवर विशेष लक्ष देण्यासाठी कोरोना योद्धा शिक्षक ,वैद्यकीय कर्मचारी , मनपा कर्मचारी व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन यांचे एकत्रित पथक तयार करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे आणि प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.
याबरोबरच होम- आयसोलेटेड असणाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीचीदेखील या पथकाद्वारे विचारपूस करुन त्यांना जास्तीत जास्त सहाय्य करणार आहे. घरातील इतर व्यक्तींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना उपाययोजनेमधील सर्व नियमांचे पालन करण्याबाबत समुपदेशनही करण्यात येणार आहे. तसेच शेजारील व्यक्तींकडून सदर नागरिकांना काही त्रास होत असल्यास अशा तक्रारी सोडविण्याचे देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. या पथकाद्वारे करण्यात येणाऱ्या दूरध्वनीला कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी तसेच प्रभारी पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी केले आहे.