कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलेले मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक हे 20 जानेवारी रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार संबंधित व्यक्तींना तत्काळ जातप्रमाणपत्र द्या असे आदेश राज्य शासनाने सर्व दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जरांगे यांनी अद्याप कुणबी नोंदी सापडलेल्यांपैकी कीती व्यक्तींना आपण प्रमाणपत्र सुपुर्द केली ? असा सवाल करत राज्य शासनाला धारेवर धरले होते. यानंतर राज्यशासनाने या हालचाली सुरु केल्या आहेत. राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दाखले देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करा, आढळलेल्या नोंदी मोहीम स्वरूपात तलाठ्यांमार्फत गावांत प्रसिद्ध करा, असेही म्हटले आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदींशी संबंधित व्यक्तींना कुणबी जातप्रमाणपत्र तत्काळ देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन )

अधिनियम, 2000 तसेच नियम 2012 व त्यांतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जातप्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश राज्य शासनाच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिले असल्याची ही माहिती समोर आली आहे.