गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मित्राच्या दुचाकीची ‘ट्रायल’ घ्यायला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार गडहिंग्लजमध्ये घडलाय. ऋषिकेश उमेश पोतदार (वय २५, रा. बुरुड गल्ली, गडहिंग्लज) असे त्याचे नाव असून हा अपघात येथील नगरपालिकेसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.

गडहिंग्लज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरुड गल्लीत ऋषिकेश काही मित्रांसह रात्री गप्पा मारत उभा होता. त्या वेळी त्याचा मित्र संग्राम पाटील हा त्याची ‘केटीएम ड्युक’ मोटारसायकल (क्र. एमएच ०९ इव्ही २१४६) घेऊन आला. त्या मोटारसायकलची ट्रायल घ्यायला ऋषिकेश बाहेर पडला. मुख्य रस्त्यावर भरधाव जाताना नगरपालिकेसमोर त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि रस्त्याकडेला थांबलेल्या एका दुचाकीला धडकून कंपाऊंड भिंतीवर आदळला. मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

संग्राम पाटील यांनी याबाबत गडहिंग्लज पोलिसात वर्दी दिल्यानंतर रात्री उशिरा याची नोंद झाली. पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. व्ही. पाटील याबाबत अधिक तपास करीत आहेत.