सावरवाडी (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर हे प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा जपणारे शहर आहे. भोजराजाची पवित्र राजधानी म्हणून ख्याती असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन कोरीव लेणी, राजघराण्यातील पराक्रमी वीरांच्या विरगळांचे भव्य वस्तुसंग्रहालय साकारणार आहे.  यामुळे गावच्या प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीमध्ये नव्या इतिहासात नवी भर पडणार आहे. प्राचीन संस्कृतीचे नवे दालन पर्याटकांसाठी खुले होणार आहे.

ग्रामदैवत शंभो महादेव मंदीर परिसरात व गावच्या शेती परिसर येथे विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या एकाच पाषाणावर कोरीव विरगळ एकत्र करुन त्यांचे स्मारक व्हावे हा विचार गावात सुरू होता. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कोल्हापुरच्या  शिवशक्ती प्रतिष्ठान आणि कसबा बीड गावच्या यंग ब्रिगेड यांच्या अथक प्रयत्नांतून गेल्या दोन वर्षात गावच्या परिसरातील प्राचीन विरगळ एकत्र करण्यात आले. दुर्मिळ विरगळ एकत्र करून ठेवल्याने त्याची माहिती नव्या पिढीला समजणे सोपे होईल.

गावातील प्राचीन विरगळ एकत्र करून त्याचे वस्तुसंग्रहालय कसबा बीड ग्रामदैवत शंभो महादेव मंदीर परिसरात उभारण्यात आले. या बाराव्या शतकातील विरगळांचे संवर्धन करण्यात आले आहे. नव्या पिढीला आपला इतिहास कळावा, या हेतूने हे संग्रहालय उभारले आहे. यासाठी सुमारे दीड लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा करण्यात आले. त्याचबरोबर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव वस्तुसंग्रहालय असल्याने ग्रामीण पर्यटक आकर्षित होऊ लागले आहेत. या प्राचीन विरगळ संग्रहालयामुळे भोजराजाची नगरी जगाच्या नकाशावर येऊ लागले आहे.