मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. काही दिवसांवर लोकसभा मतदान येऊन ठेपले आहे. अशातच राजकीय पक्ष जोरदार प्रचार- सभेला लागले आहेत. अशातच प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेंकावर आक्रमक भूमिका घेत आरोप प्रत्यआरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी, काँग्रेसवर निशाणा साधत केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचाऱ्यांकडून सरकारी तिजोरीत पैसा जमा करुन घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र, काँग्रेसकडून आता थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत

काय आहेत काँग्रेसचे आरोप..?

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्याने नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. नागपुरात जुन्या पायाभूत सुविधा तोडून नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या नावाखाली भाजपवाल्यांनी त्याचे कंत्राट आपल्याच लोकांना दिले. त्यासाठी सिमेंट, गिट्टी, वाळू पुरवठा करण्याचे कंत्राटही आपल्याच कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे नागपुरात भाजपचे सर्व लोक श्रीमंत झाले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. नागपुरात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या प्रचार सभेत मुत्तेमवार यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी, गडकरींवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. आता यावर भाजप नेते काय प्रतीउत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.