दिल्ली ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबत उमेदवारांच्या घोषणा ही केल्या आहेत. यातच काही वेळापुर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.

या पत्रकार परिषदेत 2024 च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अपवादानेच शनिवार-रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करतं.

मात्र यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते. देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.