आजरा (प्रतिनिधी) : आजरा पोलिसांनी आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गोवा बनावटीची सुमारे ५ लाख ३५ हजारांची दारू जप्त केली आहे. ही सर्वात मोठी कारवाई गवसे चेक पोस्ट येथे करण्यात आली. गाडीमध्ये बदल करून दारू ठेवण्यासाठी विशिष्ट कप्पा करण्यात आला होता परंतु पोलीस कॉन्स्टेबल अमर अडसूळ यांच्या नजरेतून सदरची गोष्ट लपून राहिली नाही. त्यातून हि तत्काळ कारवाई करण्यात आली. पो. कॉ. अमोल पाटील आणि होम गार्ड हरेर आणि कांबळे यांच्या पथकाने मिळून हि कारवाई केली. यामध्ये आयशर वाहनासहित सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनचालक खयुमपठाण अब्बास खान (वय ३१ रा मालापुरी जि बीड) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. आजरा तालुक्यातील गवसे गावाच्या हद्दीत तुळसी धाबा समोर पोलीस चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. याठिकाणी आज पहाटे सव्वातीनच्या सुमारास एक आयशर ट्रक (एम एच १२ एच डी ३४४१) हा आला. या गाडीला अडवून चालकाची चौकशी करण्यात आली. या गाडीमध्ये मागील बाजूस एक विशीष्ट केबिन करण्यात आली होती. त्यातून चोरून हा मद्यसाठा नेण्यात येत होता. गाडीची पाहणी करत असताना अडसुळे यांनी शिथाफिने हि बाब उघडकीस आणली त्यामुळे लाखांचा मद्यसाठा पकडण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच तिथे सहा. पोलीस निरीक्षक भांगे, पोलीस उपनिरीक्षक जाधव हे पोलीस फौजफाटा घेऊन तत्काळ घटनास्थळी आले. या घटनेची नोंद आजरा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.