मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून राज्यात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. त्याचबरोबर नाराज नेतेही या पक्षातून त्या पक्षात जाताना पहायला मिळत आहे. यातच अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ऐन लोकसभा निवडमुकीत काँग्रेसला खिंडार पडणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा मंत्री अत्राम यांनी केला आहे.

अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ऐन लोकसभा निवडमुकीत काँग्रेसला खिंडार पडणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील मी आदिवासी माणूस आहे कधीही खोटं बोलणार नाही. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता विजय वडेट्टीवार देखील लवकरच पक्षाला रामराम ठोकणार आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची जागाही मिळाली. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपमध्ये आले. आता लवकरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील भाजपमध्ये येतील. त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. या चर्चांचा मी साक्षीदार असल्याचा दावाही आत्राम यांनी केला आहे.

मंत्री आत्राम यांची नार्कोटेस्ट करा…
विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी टीव्ही नाईन मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी आत्राम यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्ये आहे आणि येथेच राहणार आहे. धर्मरावबाबा आत्राम हे खोटं बोलत आहेत, त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, त्यातून सत्य बाहेर येईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे पैसे आहेत पण बुद्धी नाही. त्यांच्या या टीकेनंतर आत्राम यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.