कागल (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ यांची निष्ठूर प्रवृत्ती गाडण्यासाठी व समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आम्ही कोणताही स्वार्थ न बाळगता बिनशर्त भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अशा भावना नानीबाई चिखली येथील अनेक कार्यकर्त्यांनी मनोगतात व्यक्त केल्या. वाय. टी. पाटील यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश केला. समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले.

वाय. टी. पाटील म्हणाले, राजेंची कामाची पद्धत, सामाजिक कार्य पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. कोणाला कंटाळून अथवा हेव्यादाव्यातून हा प्रवेश नाही. कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी समरजितसिंह घाटगे यांचाच एकमेव पर्याय आमच्या समोर आला.

अरविंद पाटील म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांनी सत्तेत नसतानाही शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला. घाटगे हे शेतकरी व सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करीत आहेत. आम्ही कोणत्याही अटी शर्तींविना भाजप प्रवेश केला आहे. त्यांना आमदार करणे हे एकच ध्येय आपल्या सर्वांसमोर आहे.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, सत्ता असो वा नसो समाजकारण करणे हे आमच्यावर स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी संस्कार केले आहेत. त्यानुसार सत्ता नसली तरी आम्ही खचत नाही व असली तरी हुरळून जात नाही. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम करीत आहोत. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल.

अमर पाटील म्हणाले, राजेसाहेब आपले काम पाहून कागल तालुक्यातील अनेक तरुणांची आपण आमदार व्हावे अशी इच्छा आहे. दोन दिवसांपूर्वी कागलमधील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याने खऱ्या अर्थाने कागलमध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली आहे.

वाय. टी. पाटील यांच्यासह जनता सेवा संस्थेचे संचालक बाबासो कोकणे, ग्रा.पं. सदस्या, मनीषा पाटील, प्रणिता पाटील, बबन कांबळे, पांडुरंग कांबळे, रघुनाथ चौगुले, संभाजी भोसले, अमोल लोहार, विक्रांत वडर, लखन राशिवडे, ऋषीकेश चिमगावकर, सुनील वड्ड, केरबा कुंभार, चंदर गळतगे, दादू कोकणे, प्रदीप मोरे, दत्तात्रय लोहार, अमृत चव्हाण, सचिन राशिवडे, विनायक वड्ड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.