कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांचा मूळ जलजीवन मिशन आराखड्यात समावेश नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या गावांचा आराखड्यात समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या गावांमध्ये काही दुर्गम गावांचाही समावेश होता.

या पत्राची दखल घेत मंत्री महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 39 गावांचा मूळ आराखड्यात समावेश केला.शाहुवाडी पन्हाळा करवीर आजरा चंदगड शिरोळ भुदरगड हातकणंगले कागल राधानगरी अशा नऊ तालुक्यातील 39 गावांमधील पाणी योजनांसाठी तब्बल साठ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये आजरा तालुक्यातील 1, भुदरगड तालुक्यातील 5, चंदगड तालुक्यातील 3, हातकणंगले तालुक्यातील 4, करवीर तालुक्यातील 4, कागल तालुक्यातील 8, पन्हाळा तालुक्यातील 7, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यातील एक तसेच शिरोळ तालुक्यातील 3 गावांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे या गावांचा पाणी प्रश्न निकालात निघणार असून स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होणार आहे.

या निधीबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.मतदार संघापुरता मर्यादित विचार न करता संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा विचार करत जलजीवन मिशन योजना कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेला पाठपुरावा कौतुकाचा विषय बनला आहे.