नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सरकारी रुग्णालयांच्या दुरवस्थेबद्दल न्यायालयासमोर ‘खोटे दावे’ केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले. 3 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ सहा सीटी स्कॅन मशीन असल्याबद्दलही न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सचिव (आरोग्य) दीपक कुमार यांना सांगितले की, “तुमच्या अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्व काही ठीक आहे. मग तीन कोटी लोकसंख्येच्या दिल्लीसारख्या शहरात फक्त सहा सीटी स्कॅन मशीन्स पुरेशी कशी ?

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर न्यायालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने खंडपीठाला सांगितले की, आम्ही आता पीपीपी मॉडेलवर जात आहोत. तुमची रुग्णालये सुधारण्यासाठी तुम्हाला वेगाने काम करावे लागेल, असा सल्ला न्यायालयाने दिला. रुग्णालयांच्या स्थितीबाबत सरकारी अधिकाऱ्यांचे दावे खोटे असल्याचे न्यायालयाला आढळले.

रुग्णालयांच्या दुरवस्थेला जुनी कारणे जबाबदार असू शकतात, असे खंडपीठाने म्हटले आहे. एक समिती स्थापन करणार असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. त्यात तज्ञ म्हणून काही डॉक्टरांचा समावेश असेल आणि केंद्र आणि दिल्लीच्या आरोग्य सचिवांनी नामनिर्देशित केलेल्या प्रत्येक प्रतिनिधीचा समावेश असेल. ते जे काही सूचना देतील, त्या आम्ही तुमच्यासमोर ठेवू आणि त्यानंतर तुम्हाला त्यानुसार काम करावे लागेल.