कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरने, रात्री ९ नंतर आस्थापना सुरु ठेवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल गेल्या आठवडयात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून १ हजार ९६१ जणांकडून २ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
गेल्या आठवडयात दंडात्मक कार्यवाही केल्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या १ हजार ६२० जणांकडून १ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर सामाजिक अंतर न ठेवल्याबद्दल ११२ जणांकडून ६५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्याबद्दल १९७ जणाकडून ३९ हजार ४०० रुपयांचा दंड, रात्री ९ नंतर आस्थापना सुरु ठेवल्याबद्दल एका जणाकडून ५०० रुपयांचा दंड आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबददल ३१ जणाकडून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहे. सध्या कोराना बाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी दसरा, दिवाळी सणामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचेही आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले आहे.