कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफाळा ऑनलाईन भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून कोल्हापूर महानगरपालिकेकडे यावर्षी ५ कोटी ४१ लाखाचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला आला आहे. तसेच घरफाळा तत्काळ भरल्यास  २ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा महापौर सौ. निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे  यांनी आज (सोमवार) केली. 

महापौर म्हणाल्या की, कोल्हापूर शहरवासीयांनी त्यांची घरफाळा आणि पाणीपट्टीची देय रक्कम महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अथवा ऑनलाईन पध्दतीने भरावी. घरफाळा तत्काळ भरल्यास  २ टक्के सूट मिळणार असून ही सवलत डिसेंबरअखेर चालू वर्षीच्या घरफाळा रकमेवर मिळणार आहे. कोरोनाची परिस्थिती असूनही नागरिकांच्या सहकार्यामुळे यावर्षी ३१ कोटी २६ लाखांंची घरफाळा रकमेची वसुली झाली आहे. या आर्थिक वर्षात सुमारे ६७ हजार  मिळकतधारकांनी आपला कर भरणा केला आहे. ३१ डिसेंबरअखेर घरफाळा थकबाकी रकमेवर ९० दिवसानंतर महिन्याला २ टक्के प्रमाणे दंडव्याज आकारले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.